Wednesday, 19 December 2012

एक गाव - आंबोली
                                             
                                   
सिंधुदुर्ग  जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. आणि त्याच बरोबर त्यामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये असणारी  निसर्ग संपन्न ठिकाणे हळू हळू पुढे येऊ लागली. सिंधूदुर्ग म्हणजेच  कोंकण आणि कोंकण म्हटलं कि डोळ्यासमोर येत ते म्हणजे तेथील शांत समुद्र किनारे, नारळ - सुपारीच्या बागा, लहान मोठे डोंगर आणि त्यातच कुठे तरी डोक वर काढणार कौलारू घर. सिंधुदुर्ग मधील गावागावात हाच नजारा पाहायला मिळेल आणि अश्यातच त्यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागेल आणि ते म्हणजे आंबोली.
                                   
आंबोली - फक्त नावच बस आहे ज्याला जे जे  हवे ते ते त्याला तिथे मिळेल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव. आंबोली घाटाच्या माथ्यावर वसलेलं व तीनो बाजूनी डोंगरांनी वेढलेल अस याची ओळख सांगता येईल. गरिबांच महाबळेश्वर म्हणून हि याला ओळखल जात. आता आंबोली म्हटल कि पहिल डोळ्यासमोर येत ते म्हणजे तेथील निसर्ग रम्य दृश्ये. उन्हाळा असो कि पावसाला नेहमीच तिथे काही तरी स्पेंशल असतच. पावसाळ्यात चोहो बाजूनी उतरणारे मोठमोठाले धबधबे , सततचा मुसळधार कोसळणारा पाउस, आणि तो पडून गेल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेलं  धुकं. बस आता शोधात बसा आपण यात कुठे हरवलो आहोत का ?  का जणू स्वर्गातच हरवलो आहोत ?  कधी पाऊस अन धुक्यात दिवस संपून जातो काही कळतच नाही अन रात्र होताच बेडकांच सुरु होणार भजन मग शेजारी असणाऱ्या जंगलाची आठवण करून देतच .

आता म्हणाल आंबोलीत उन्हाळा कसा काय चांगला ? तर त्याच कारण अस कि आंबोली ब्रिटीश काळापासून एक थंड हवेच ठिकाण म्हणून उदयास आल. त्यामुळे ब्रिटीश आणि मग त्या नंतर तिथे असणारी राजवट आंबोलीचा वापर आराम करण्यासाठी व सुट्टी घालवण्यासाठी करू लागले. चार महिन्यांचा पडलेला मुसळधार पाऊस, असलेलं अफाट जंगल आणि यांनी साठवून ठेवलेला गारवा उन्हाळा संपेपर्यंत वातावरणात एक थंडावा निर्माण करून ठेवतो.  कुठेही पाहिल्यावर फक्त आणि फक्त हिरवळ . डोळ्यांना शांतता हवी असेल तर नक्कीच आंबोली काही वाईट नाही. त्यामुळे नेहमीच इथे पर्यटकांची रिघ लागलेली असतेच.
                                     
डोंगरातून कोसळणारे धबधबे ,आंबोली घाटाचे विहंगम दृष्य , धुक्यात हरवलेली नागमोडी वळणे, रस्त्याच्या खालून वाहणाऱ्या नद्या , घाटाचा प्रवास करताना लागणारे जंगल , पावसाळ्या नंतर सर्वत्र येणारी फुलांची चादर अन मग त्यावर येणारी फुलपाखरे. अरे बस अजून काय हव. कसा दिवस संपून जाईल याचा पत्ताच लागणार नाही अश्याने. शहरात वेळ जात नाही अस म्हणणारे बरेच पाहिले मी पण मी त्यांना सांगू इच्छितो कि जाऊन बघा आंबोलीत, अरे इथे वेळ पुरत नाही काही करायला. अन जो गेला तो फसलाच समजा, मग त्याच्या मनात हा एकच विचार आलाच समजा  - "आपल पण इथे एक घर असाव".
                                     
पण आंबोलीला जर कुणी कधी जायचं अस विचारल तर मग मी आवर्जून सांगेन कि पावसाला अन हिवाळ्यात  न विसरता जा . पावसाला कुणाला आवडत नाही आणि नाही जरी आवडत असला तर मग एक वेळा बघाच काय असतो तो पावसाला. थांबायचं नाव न घेणारा पाऊस अन त्याला पुरेपूर सोबत देणार धुक. घराच्या आडोश्याला थांबून पाऊस जाण्याची वाट बगत असाल तर मग फसलाच समजा. त्यापेक्षा अजून एक पर्याय आहे मस्त पैकी पावसाचा आनंद घ्या अन भरपूर भिजा.... अरे हो पावसात भिजलाच आहात तर आता चहा आणि खेकडा भजी तर झालीच पाहिजे.  पण  धबधब्यांच्या खाली भिजण्याची मजा काही औरच आहे. आंबोली हून सावंतवाडी ला जाताना घाट रस्त्यात लागणारा मोठा धबधबा आणि त्याखाली झालेली अंघोळ , नांगरतास धबधब्याचे विहंगम दृश अन शेवटी कावळेसाद ची दरी अन परत त्यात कोसळणारे धबधबे. कावळेसाद पॉईटवर गाडी पार्क केली आणि बाहेर पडल कि अस वाटत  पाऊसच चालू आहे पण थोड पुढे गेल्यावर कळून चुकत कि अरे हे तर दरी मध्ये पडणारया पावसाचे तुषार परत वारयामुळे वर येताहेत. कधी कधी तर अस वाटत कि पाण्याची जणू भिंतच तयार झाली आहे. धुक्याने गच्च भरून गेलेल्या दरीचा कधी कधी अंदाजच येत नाही पण जेव्हा दरी मोकळी होते तेव्हा समोर उभी असणारी खोल दरी व  एकमेकात मिसलेल्या पर्वत रांगा मन प्रसन्न करून सोडतात. खरच इथे होणारा धुक्याचा खेळ पाहण्याजोगा असतो.
                                     
सिंधुदुर्ग , कोल्हापूर आणि बेळगाव या सीमांवर वसलेलं हे गाव म्हणजे तस तर निसर्गाची पर्वणीच म्हणावी लागेल. जे आहे ते आंबोलीत आहे अस म्हटल्यास काही चुकीच ठरणार नाही. " भगवान देता हे तो छप्पड फाडके देता हे " हि म्हण आंबोलीला पुरेपूर लागू पडते. म्हणूनच तर जैवविविधतेवर काम करणाऱ्या निसर्ग अभ्यासकांची नेहमीच रिघ  आंबोलीच्या दिशेने असते. पावसाला सुरु झाला कि यांची पाऊले आपोआपच या दिशेने पडू लागतात. मग काय भर पावसात पण हातामध्ये कॅमेरा घेऊन फिरणारी मंडळी रस्त्यारस्त्यात न दिसणे अस होणारच नाही. दिवस सोडा रात्रीही तुम्हाला बरेच टॉर्च रस्त्याने फिरताना दिसतील. अश्या वेळी घाबरून जाऊ नका हि आपलीच मानस आहेत अन पर्यावरणाचा अभ्यास करताहेत. आणि याचा फायदा असा झाला कि आज यांच्या मदतीने तेथील काही युवकांनी एकत्र येउन पर्यावरण रक्षणासाठी पाऊले उचलली आहेत व यातूनच पर्यावरण पूरक पर्यटनाच्या माध्यामधून रोजगार चालवला जात आहे. आणि आज ये युवक तिथे येणाऱ्या पर्यटकास स्वतःच्या नजरेतून आंबोलीच दर्शन घडवून आणतात . तसेच या युवकांनी आंबोलीत जंगल सफारी पण सुरु केली आहे. तुम्हाला जर खर जंगल अनुभवायचं असेल तर यांच्या मदतीने तुम्ही ते साकार करू शकता. आज याच  युवकांच्या मदतीनेच  आंबोलीत सापडणारया जैवविविधतेचा अभ्यास केला जात आहे. मिळणारे एकून साप, बेडूक, झाडे , पक्षी, फुलपाखरे, प्राणी यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवल्या जाताहेत. त्यामुळेच गेल्या २ वर्षात इथून बरयाच नवीन जाती सापडून आल्या आहेत अन याच संपूर्ण श्रेय जात ते या निसर्गसेवकाना.
                                         
पावसाळा संपताच सुरुवात होते ती थंडीची अन आंबोलीतील थंडी म्हणजे गुलाबी थंडी, म्हणूनच तर नवीन नवीन लग्न झालेली जोडपी अशा वेळी आंबोली ला भेट देतात. दिवाळी व नंतर क्रिसमसची सुट्टी मुलांना पडली रे पडली कि पर्यटक आंबोलीला भेट द्यायला येतातच . नुकताच पाऊस पडून गेलेला असल्या कारणाने सर्वत्र हिरवगार झालेल असत. दिवसा वेगवेगळी ठिकाणे पाहून दमून आलेल्या लोकांना रात्री धुक आणि थंडी म्हणजे एक पर्वणीच आहे. मग काय दोन दिवसासाठी आलेला पर्यटक आपला मुक्काम अजून वाढवतोच. आणि याच दरम्यान रस्त्यातून चालताना हॉटेल मधून येणारा माश्यांच्या वासाचा मोह मग फार कमी जणांनाच आवरतो अन बरयाच जनाकडून यावर ताव देखील मारला जातो.  मालवणी जेवण अन ते पण घरगुती मग काही बोलायलाच नको. मग अशा वेळी अगोदर बुकिंग करून ठेवावी लागते नाहीतर मग नुसत वासावारच समाधान मानाव लागेल.
                                          
तस आंबोलीत पाहण्यासारख्या बरयाच गोष्टी आहेत पण तुम्ही ते कोणत्या नजरेने पाहता यावर अवलंबून आहे.  आज इथे येणारा पर्यटक हा वेगवेगळ्या कारणासाठी आलेला असतो. काहीजण फक्त आणि फक्त मजा मारण्यासाठी आलेला असतो , काहीजण असेही असतात कि जे फक्त जंगलात फिरण्यासाठी आलेले असतात तर काहीजन हे फक्त आराम हवा म्हणून आलेले असतात. आता तुमी कोणत्या कारणासाठी येणार आहात हे तुम्हाला माहित. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असतील तर काय वाईट आहे. प्रदूषण विरहित हवा, मोकळे रस्ते , शांतता कुणाला आवडणार नाही. अजूनही मुख्य बाजारपेठ सोडली तर इतर ठिकाणी अजून हि जुन गावच आहे. तीच मातीची जमीन, मातीच्या चुली अन घरासमोर असणार अंगण आजही इथे पाहायला मिळत. गावतील मुल अजूनही गोट्यांचा खेळ विसरलेली नाहीत, आजही अंगणात विठू - दांडू खेळली जाते अन लगोरीही. कौलारू घर आणि त्या मधून येणारा स्वयंपाक घरतला धूर आजही इथे पाहायला मिळतो. म्हणूनच आज इथे होम स्टे सारख्या कल्पना साकारल्या जात आहेत जेणे करून आपल्या हरवलेल्या संकृतीची प्रत्येकास आठवण राहील.
                                          
अशी आहे तर आंबोली. तर मग विचार करा आंबोली काही दूर नाही.

         
abhi.narvekar01@gmail.com